5 लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी 15 हजार रु. : धान उत्पादक शेतकरी प्रोत्साहन योजना
धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून आता प्रतिहेक्टरी प्रोत्साहनपर 15000 रु. देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने 14 फेब्रुवारी 2022 दिवशी घेतला आहे.
1 हजार कोटीची मान्यता
शासनाच्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर तब्बल 1 हजार कोटी रुपयांचा भार पडणार असून शासनाच्या या निर्णयामुळे अंदाजे 5 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात घोषणा केली होती. 2022-23 या खरीप हंगामात केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या हमी भावाव्यतिरिक धान लागवडीखालील जमिनीसाठीसुद्धा प्रती हेक्टरी 15 हजार रु. प्रोत्साहन देण्यात येणार आहेत. प्रोत्साहनाची मर्यादा 2 हेक्टर पर्यंत असेल.
तब्बल 6 लाख हेक्टरवर धान उत्पादन
चालू वर्षांमध्ये जवळपास 5 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असून तब्बल 6 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धान उत्पादन घेण्यात आलेले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
निर्णय का घेण्यात आला ?
तुम्ही जर यापूर्वीचा विचार केला, तर खरीप हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 700 रु. इतकी रक्कम प्रोत्साहनपर देण्यात येत असे; प्रतिक्विंटल देण्यात येत असलेली ही रक्कम परवडण्याजोगी नसल्याकारणाने शासनामार्फत महत्त्वाचा निर्णय घेऊन आता प्रती हेक्टरी धान उत्पादक शेतकऱ्यांना 15 हजार रु. देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला असून याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल. मागील धान उत्पादक प्रोत्साहनपर रक्कममध्ये बदल करण्यात आल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.